रामसीताविवाह

 १७. रामसीताविवाह

असा तसा हो नकाच समजू विवाह सीतारामांचा! ध्रु.

मेघश्यामा माळ घालता कणकण मोहरलीसे सीता 
मायाब्रह्माचे ते मीलन गजर जाहला वाद्यांचा !१

नयनांनी श्रीराम पाहिला नकळत तेथुन अंतरि आला 
भक्ती वरते श्रीभगवंता छंद जिवाला नामाचा ! २

ज्याची होती वाट पाहिली अवचित त्याची प्राप्ती झाली 
रामाचरणी सर्व समर्पण असून अनुभव नसण्याचा ! ३

तने दोन परि एकच आत्मा सोऽहं श्रीराम तो परमात्मा 
अशी निरंतर खेळीमेळी प्रपंचही परमार्थाचा ! ४

'मी माझे पण' मावळलेले ऐसे दोघे समरस झाले 
समाजार्थ हे जीवन आहे विसर व्यक्तिगत स्वार्थाचा ! ५

भरून येती फिरून डोळे घर्मजले कर झाले ओले 
उधाण आले सात्त्विकतेला मुहूर्त कैसा भाग्याचा ? ६

सीतारामांची ही जोडीं वर्णाया भाषाच तोकडी 
परस्परांना पूरक दोन्ही विषय जाहला नवलाचा ! ७

गुणरूपांचा अपूर्व संगम गंगायमुनांचे हे मीलन 
राम सावळा सीता गोरी ठेवा हा लावण्याचा ! ८

सत्यावर निष्ठा रामाची पतिमय झाली सीता कधिची 
द्वैताला ना मुळीच थारा विलास आत्मारामाचा ! ९

न बोलताही मनोगत, नकळत होती पूर्ण मनोरथ
मागितल्याविण सगळे मिळते अनुभव पृथ्वीमोलाचा ! १०

श्रीरामाच्या हृदयी सीता, सीता जाणे रामयोग्यता 
सीताराम जय सीताराम गजर चालला नामाचा ! ११

धर्माचे ते मर्म जाणले भगवत्पूजन कर्म मानले 
मुळी फलाची नसे अपेक्षा आदर्शच आदर्शाचा ! १२

मने मोकळी समरसलेली मिळून दोघे मार्ग चालली 
रुसवा फुगवा तेथे कुठचा ? ऐसा सामंजस्याचा !१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments