श्री हनुमंताचा प्रसाद
४. श्री हनुमंताचा प्रसाद
मागतोस तर हा 'प्रसाद' घे
होई दास श्रीरामाचा !ध्रु.
सेवा करता तनमन हरपुन
देहातच दे राघव दर्शन
छंद धरी तू सत्कार्याचा!१
'मी पण' जाता उजळे जीवन
मन पवनाला मिळते जाउन
मानकरी तू रवितेजाचा!२
मी नच कर्ता रामच कर्ता
श्रेय यशाचे प्रभूस देता
आवडता तू हो सकलांचा!३
स्वामींवर धर असीम निष्ठा
द्रोणागिरि ये सहज पेलता
सागर तू हो उत्साहाचा!४
कर्तव्याच्या मार्गावरती
कंटक सुमने लगेच होती
अनुभव घे रे समरसतेचा?५
शक्तिसंचया मना आवरी
रामरूप सगळे नरनारी
धडा गिरवशी दास्यभक्तिचा!६
आशीर्वच हे श्रीरामाचे
जयां लाभती ते भाग्याचे
गजर करी तू श्रीरामाचा!७
कांचनात का राम असे तो?
भक्ताहृदयी राम राहतो
ध्यास धरी श्रीरघुनाथाचा!८
सेवक, सैनिक दोन्ही होशिल
सावधान या मंत्रा जपशील
तो तर सागर करुणेचा!९
राम नि रावण काय व्हायचे ?
तुझ्या कृतीने ठरावयाचे
विचारवंतच तो भाग्याचा!१०
हातुन घडते जधी सत्कृती
राम प्रभू आलिंगन देनी
ध्यास धरी रे या ध्येयाचा!११
रामकथेचे मर्म जाणशिल
दीनोद्धारा अंगे झटशिल
प्राणप्रिय तू हो सकलांचा!१२
श्रीरामाने सर्व करविले
काय जाहले मला न कळले
अनुभव घेई तू शांतीचा!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर
Comments
Post a Comment