श्रीरामाला रुचते का हे

 २२. श्रीरामाला रुचते का हे 

'कसे वागतो, कसे बोलतो' गोष्ट जरी ही साधी 
श्रीरामाला रुचते का हे? विचार करू या आधी!ध्रु.

सरळ मनाने विचार करणे
दुसऱ्याचे तर हृदय जाणणे 
क्षमाशीलता कृतीत येता साधे सहज समाधी!१ 

नाम मुखी ते नित्य असावे 
नामासंगे रंगत जावे 
चंद्रासम जर झालो शीतल, करील काय उपाधी?२ 

विनम्र व्हावे शिकत रहावे
वडीलधाऱ्यां सुखवित जावे 
करू परिश्रम, घर मग आश्रम, बरी राहणी साधी!३ 

संयम थोडा शिकता आला
हवाहवासा मानव सकलां 
कृतीतुनी संस्कृतीच दिसते सार जाणु या आधी!४ 

आसक्ती कसलीच नसावी 
ऐसी भक्ती कृतीत यावी 
दासाचा हो देव मारुती सारे जग त्या वंदी!५ 

विचार आचारात असू दे 
जसे बोलतो तसे चालु दे
सुसंगती ही सुखद सुखदशी परमार्थाची नांदी!६

वनात जाता ये काटकपण 
निरीक्षणातुन मिळते शिक्षण 
नच मर्यादा ज्ञान मिळविण्या व्हावे तत्पर आधी!७ 

सत्कर्माला यज्ञ म्हणावे 
यज्ञरक्षणा सुसज्ज व्हावे 
पुण्य प्रतापासंगे असता कोण जुमानी व्याधी?८ 

'मी कर्ता' ऐसे न म्हणावे 
रामच कर्ता ध्यानी घ्यावे
बंधुभाव त्या बंधुजनांचा ध्यानी घेऊ आधी!९ 

किती मधुर शबरीची बोरे 
भाव धरा रे राम भजा रे 
या देहातच लाभे मुक्ती युक्ति असे ही साधी!१०

कुटुंबनीती श्रीरामायण 
समाजनीती श्रीरामायण
व्यक्ती व्यक्ती मिळुनि समष्टी जनार्दना आराधी?११

श्रोते सगळे गायक होती 
मनास भिडते उक्ती उक्ती
रामनाम सोहळा रंगला रामकृपा का साधी?१२

रामकथा ही शिकवत राही 
प्रसाद याविण दुसरा नाही
जीवनात ये राम आणता उमेद धरू या आधी?१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद