ऐका श्रीरामाची कथा
२१. ऐका श्रीरामाची कथा
ऐका श्रीरामाची कथा !
कथा ऐकता मिटेल सगळी
अंतरातील व्यथा ! ध्रु.
उदार न्यायी राजा दशरथ,
स्त्रिया पतिव्रता वरितो सत्पय
पुत्र परि नव्हता!१
मुनी सांगती यज्ञ करावा,
यत्न करावा वर मिळवावा
प्रसाद ये हाता!२
एकच का सूत चार जन्मले
पुरुषार्थाचे दर्शन घडले
सुखवी रामकथा!३
परस्परांशी गोड वागता
सेवाभावे गुरु तोषता
ज्ञानलाभ हाता!४
दैत्य मारिले यज्ञ रक्षिले
राम नि लक्ष्मण सवे चालले
ती तर अद्वयता!५
शिळेसारखी पडून राहिली
राम भेटता जागृती आली
स्वरूप आठविता!६
रामाने शर धनुस जोडता
भंगे शिवधनु विस्मय जगता
प्रमुदित भूमिसुता! ७
विघ्नच वरवर आत सुसंधी
अशुभातुन शुभ निघते अंती
राम वना निघता!८
छायेसम सौमित्र संगती
भरतही उतरे प्रेमकसोटी
उदात्त मन दिसता! ९
कपटी रावण पळवी सीता
आमंत्रण निजमरणा देता
रंगत जाय कथा!१०
मारुतिराया सेवक झाला,
सीतेचाही शोध लागला
योग्य दिशा मिळता! ११
महती मोठी स्त्री शीलाची,
आग सांगते श्रीलंकेची
वंदित हनुमंता!१२
मारूनि रावण युद्ध संपले
बिभीषणाला राज्यहि दिधले
सुखद अशी सांगता! १३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर
Comments
Post a Comment