श्रीरामायणरहस्य-चिंतन

 ८. श्रीरामायणरहस्य-चिंतन

राजा दशरथ नीतिमंत तो बलशाली होता 
कौसल्या शालिनी सुशीला त्याची पतिव्रता !१

त्यांच्या उदरी यत्नरूप अवतरे प्रभू राम 
लक्ष्मण आाला शक्ति घेऊनी बंधू गुणधाम !२

भरताच्या मनि बंधुप्रीती सरल हृदयता ती
अनुकरणे शत्रुघ्न धन्य हो बालक शुद्धमती!३

सत्यरूप सीतेने वरिले श्रीरघुनाथाला
धरती उल्हासाने भेटे जैसी गगनाला!४

कांचनमृगमोहाने फसली व्याकुळली सीता 
अहंकाररावणे झडपली संधी सापडता!५

श्रीरामाच्या नामस्मरणे कल्याणच झाले 
भक्तिरूप हनुमंते पतिचे कुशल सर्व कथिले!६

अहंकारदैत्याला वधिता सफल रामकार्य 
रामायण सांगते, मानवा पणा लाव शौर्य!७

यत्ना अंती यश ठरलेले विनम्रता भक्ती 
या देहातच मुक्ति लाभण्या सापडते युक्ती!८

अशांत लंका शांत अयोध्या पोचावे तेथे 
विकारवादळ चित्तामधले नीतीने शमते!९

नीती सुटता विटंबना ती त्रैलोक्यी होते 
सांगे भारत उभ्या जगाला 'सत्यमेव जयते'!१०

कुटुंबनीती हे रामायण पारायण करणे 
सौहार्दाने सामर्थ्याने नारायण बनणे!११

सेवाभाव नि टापटीप ती काय कमी येथे ? 
गृहलक्ष्मी ही संस्कारांनी घर मंदिर करते!१२

श्रीरामाची कथा ऐकता जाणू भावार्थ
शिकता शिकता कथा पसरवू पाची खंडात!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद