कल्याण करी रामराया!
३४. कल्याण करी रामराया!
कल्याण करी रामराया ! रामराया !
जनहित विवरी ! जनहित विवरी !ध्रु.
कोण असे मी समजत नाही
काय करू मी उमजत नाही
तू मज बोध करी दयाळा !१
हताश का मी समजत नाही
तमोगुण मला सोडत नाही
कल्पित दुःख हरी कृपाळा !२
स्वकर्म मजला रुचतच नाही
सुधारणा तर घडतच नाही
कर्मी कुशल करी दयाळा ! ३
घडी घडी तर वाया गेली
सत्कृत्याची संधि दवडली
अजून दक्ष करी कृपाळा ! ४
मी माझे हे विसरत नाही
देहबुद्धि ही सुटतच नाही
तू मन शुद्ध करी दयाळा ! ५
तव पूजन मी कसे करावे
अभ्यासी मी कसे रमावे ?
आसनि स्थिर बसवी कृपाळा! ६
प्रपंच हातुन घडव नेटका
कृतीकृतीतुन मुरव विवेका
ज्ञानी मजसि करी दयाळा !७
परमार्थाचें मर्म कळू दे
इथे तिथे मज तोच दिसू दे
प्रज्ञावंत करी कृपाळा ! ८
देहदुःख मज सुख वाटावे
विलासात मन नच गुंतावे
अलिप्त पूर्ण करी दयाळा!९
खेडोपाडी मला हिंडवी
सेवा काही हातुन घडवी
तत्पर मजसि करी कृपाळा !१०
दासबोध तू शिकव आतुनी
आत्मारामा येई धावुनी
तळमळ तू शमवी दयाळा !११
तळमळ तू शमवी दयाळा !११
रामामधला राम दिसू दे
माझी मजला ओळख पटू दे
सुशांत स्वस्थ करी कृपाळा ! १२
या भिक्षेची दीक्षा दे रे
सोसायाला शक्ति दे रे
कृतार्थ अंति करी दयाळा !१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर
Comments
Post a Comment