सुश्लोक श्रीरामाचे

 २०. सुश्लोक श्रीरामाचे

कथा राघवाची मनाने कथावी । कथा राघवाची मनाला कथावी 
मनाने मनाला सुधारीत जाता। रघूनाथ अंगे निवारील चिता १

घनश्याम श्रीराम सद्भाव आहे। घनश्याम श्रीराम तो आत आहे। 
तया घेउनी नाम तू आळवावे । प्रभू संकटी धाव घेई स्वभावे २

मना सज्जना राम चिंतीत जावा । सदाचाररूपी प्रभू ओळखावा । 
जया रामविश्वास तो भाग्यवंत । जया रामविश्वास तो धैर्यवंत ३

तुझे कार्य चालो नको खंड काही । कृती वावगी तो करू देत नाही । 
तुझ्या वर्तनी जो अहंकार दैत्य । तया विंधण्या चापपाणी समर्थ ४

जरा मीट डोळे पहा आत आत । जनी वा वनी वसावे निवांत । 
विकाराविना वा विचाराविनाही। तुला जाणवे गोड निःस्तब्धताही ५

नको कामना पूर्वजांच्या धनाची । नको वासना बंगल्याची घराची । 
तुझे धाम श्रीराम चैतन्य आहे । सदा लक्ष्य तेथेचि ठेवूनि राहे ६

खरा वारसा सद्गुणांचा मनाचा । खरा वारसा सत्कृतीचा मतीचा । 
खरा संत तो जो करी वृत्ति शांत । क्षमाशील श्रीमंत तो युक्तिमंत ७

असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा । 
हवा राम ज्याला तये राम व्हावे । जसा ध्यास ज्याला तसा तो स्वभावे ८

मनाने मना जोड दे तेच नाम । जिथे नाम गाजे तिथे पुण्यधाम । 
मीपणा सोड गेलीच चिंता खरी माय जाणे मुलाची अवस्था ९

असे प्राप्त ते का न हाती धरावे । नसे त्याविषी ही का वृथा खिन्न व्हावे। 
खरा राम दाता निवारील भूक । मला बालका देउनी आत्मसौख्य १०

अरे रामराज्या मनी स्थान देई । झणी शांति तेथे निवासास येई । 
तुझे कार्य हे राघवाचीच सेवा । मना सर्वदा चाख तू नाममेवा ११

तुला जे कळे वागणे ठेव तैसे। जसे बोलशी वागणे ठेव तैसे । 
तुझी चूक जेव्हा तुझ्या ध्यानि येई। तया दक्ष राही सुधारून घेई १२

प्रयत्नात रामास तू भेट नित्य । निराशा पळावी असे साध कृत्य । 
सदाचार वाढे तया नाव पथ्य । अधिष्ठान श्रीराम संपूर्ण सत्य १३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद