रामनामगजर

 ७. रामनामगजर

रघुपति राघव राजाराम 
पतितपावन सीताराम!ध्रु.

प्रेमाने हा गजर करू, भवसागर हा पार करू 
कर्म घडावे ते निष्काम!१

नरनारी मंदिर आहे, राम अंतरी रमताहे 
भजने होई मंगलधाम!२

शबरी भोळी मी व्हावे, सेवेने जन सुखवावे 
जे जे दिसते ते ते राम!३

ओघे आले काम करू, श्रीरामाचे नाम स्मरू 
देहबुद्धि लोपविते नाम!४

सत्कार्याच्या पाठी राम, उत्साहाला पुरवी राम 
सेतुबंधना संघच राम!५

घाम गाळुया शेतात, मोत्ये भरती कणसात 
श्रमात नांदे रघुपति राम!६

निर्व्यसनी तो भक्त खरा, सदा हसतमुख वीर खरा
त्याला कळला प्रभु श्रीराम!७

द्रव्याचा हव्यास नसो, कामचोरपण नसो नसो 
कर्मे करता गाळू घाम!८

श्रीरामाचे घर आहे, घर कसले? मंदिर आहे 
जनी मनी घुमताहे राम!९

गृहलक्ष्मीला सुखवावे, नारायण मग म्हणवावे 
सदन होतसे शांतीधाम!१०

कर्तव्याचे भान हवे, चिंतन सुचते नवे नवे 
अंतरि हासे आत्माराम!११

मायतात हे गुरु असती, बालमंडळी ती शिकती 
सदैव राहो याचे भान!१२

समाज राम व्यक्ती राम, संस्था राम सेवक राम
श्रीरामाला नम्र प्रणाम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद