यज्ञरक्षण
१२. यज्ञरक्षण
एक आम्हाला आहे ठावे, यज्ञाचे रक्षण करणे ! ध्रु.
सत्कर्माला यज्ञ म्हणा
मी नच कर्ता हे जाणा
देवासम ना दुसरा कोणी, भार तयावर सोपविणे !१
पोलादाची अमुची छाती
मोठी माता इथली माती
पाउल पुढती नेटे पडते वज्रासम मानस होणे !२
दैत्यांचा प्रतिकार करू
आली विघ्ने दूर करू
भित्यापाठि तर ब्रह्मदैत्य हो, धैर्याचा पर्वत बनणे !३
यज्ञ न केवळ कुंडात
यज्ञ नांदतो त्यागात
तनमनधन देशास वाहता, जीवन उजळे तेजाते !४
व्यसनांना समजा दैत्य
घातक रूढी या दैत्य
ज्ञानाने अज्ञान सारू या, अशांतास शांती देणे!५
कुंभकर्ण जो आळस तो
राष्ट्रजीवना पोखरतो
परावलंबी कुणी नसावा जळो, जिणे लाजिरवाणे !६
भुकेल्या जना तृप्त करू
रुग्णांनाही स्वस्थ करू
आरोग्याची महती कळता, यत्नालागी कुठे उणे?७
खेडोपाडी हिंडावे
जे जे ठावे शिकवावे
देवघेव ज्ञानाची करता, बल देशाचे होत दुणे!८
साधेपण आचारात
सात्त्विकपण आहारात
श्रीमंती ती खरी मनाची, जनी जाणता हे जाणे!९
रक्षिले असे यज्ञाला
तर तो रक्षी अपणाला
परस्परांशी समरस व्हावे, प्रेमहि रामाचे देणे!१०
पराक्रमाची शर्थ करू
प्रगतीचे ना युद्ध हरू
उत्साहे उत्साह वाढवत, गाऊ या जीवनगाणे!११
पाया भक्कम निर्भयता
प्रगति प्रासादाकरता
समर्थ जीवन सांघिकतेने, समुदायाचे हे म्हणणे!१२
अर्थ कळावा यज्ञाचा
वेदांची यास्तव वाचा
थेंब एकटा सुकून जाई, बिंदूनी सागर बनणे!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर
Comments
Post a Comment