दासबोध सांगे
३३. दासबोध सांगे
दासबोध सांगे स्मरा रामनाम ! ध्रु.
नाम घेता वाटचाली,
यज्ञ पावलो पावली
न लगे द्यावा दाम !१
नामी वसते देवत्व,
वाचे स्फुरवी कवित्व
जीवन हो सुखधाम !२
येता जाता घोकावे,
नामस्मरणे हरखावे
शुद्ध स्वरूप नाम !३
कष्ट न कसले देहाला,
नाम जोडता श्वासाला
वर्मबीज प्रभु नाम!४
नामच वैभव रामाचे,
नामच आलय शांतीचे
अधनाचे धन नाम !५
पातकराशी जळतात,
स्वकर्म कुसुमे फुलतात
नाम जपावे अविराम !६
सोयर नाही सुतकहि नाही,
स्थलकालाचे बंधन नाही
कसेहि करुनी घ्यावे नाम !७
तीर्थक्षेत्रे नामात,
पूजाद्रव्ये नामात
शिवहि घेतसे नाम !८
निराश होऊ नको मना,
नको रडू रे कुढू मना
अमृतमय ते घे नाम !९
शरीर देऊळ मानावे,
अंतरि रामा निरखावे
सोऽहं हंस श्रीराम !१०
अभ्यासाला बसावे,
नित्य राघवा भेटाबे
अजपाजप चालवि राम !११
भक्तिपथावर चाल तरी
भीतिमुक्त होशील तरी
सोबत करतो श्रीराम !१२
विसर्जन करी मोहाचे
विसर्जन करी शोकाचे
रात्रंदिन तू जप रे राम ! १३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
Comments
Post a Comment