दासबोधातून श्रीराम

 २५. दासबोधातून श्रीराम

श्रीराम जयराम जय जय राम!ध्रु.

दासबोध हा ग्रंथ असा अध्यात्माचा देत वसा 
मना घ्यावया लावी नाम!१

बोधाचा करता मान शिष्याचे हो कल्याण 
आत्मसुखाची पडे न वाण!२

एक एक ओवी घ्यावी मनात अपुल्या भिजवावी 
पठण असे गंगाजल पान!३

सावधान तो असे सुखी बेसावध होतो दुःखी 
आत्मारामच सौख्य निधान!४

प्रपंच न लगे सोडावा विवेक साथी जोडावा 
सदनच होई मंगलधाम!५

विचारेच हो सार्थकता सत्यालागी अनुसरता 
आनंदाचा कंदच राम!६

साधकास साधन पूरवी संशय तिळही नच उरवी 
देहाचा नुरतो अभिमान!७

बरे बोलता सुख वाटे अनुभवास जर हे येते 
ज्या त्या जीवा माना राम!८

मी माझे हे विसरावे मी रामाचा घोकावे 
चितांना दे पूर्ण विराम!९

आळस रावण समजावा उद्यम राघव मानावा 
यत्नाचे गावे महिमान!१०

होणारे होत जाते चित्त न काही डळमळते 
सत्त्वगुणाचा दाता राम!११

काळ कसाही येऊ दे राघवपदी मन राहू दे 
श्वासाला हे जुळू दे नाम!१२

रामदास माझी आई अंतरि येउनिया राही 
दासबोध मुक्तीसोपान!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना :  जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद