श्रोतेमुखी रामायण

 १४. श्रोतेमुखी रामायण

श्रोतेमुखी रामायण । तनामना घडे स्नान 
कर्तव्याचे येई भान । ज्याला त्याला। १

ज्याला त्याला गाता येई । आनंदाचा लाभ होई 
मन उंच उंच जाई । नीलाकाशी ।२

नीलाकाशी दिसे राम । जाणवे तो आत्माराम 
अज्ञानाचे नुरे नाम । विद्यानंद। ३ 

विद्यानंद कलानंद । कलानंद योगानंद 
योगानंद भावानंद । सामरस्ये।४

सामरस्ये गाता गाता । रामनाम घेता घेता 
देहभाव लया जाता । समाधान । ५

समाधान चिंतनाने । समाधान अर्थज्ञाने 
समाधान विस्ताराने । कोठेही जा । ६

कोठेही जा मिळे प्रेम । राम वाहे योगक्षेम 
पाळवून घेई नेम । स्वाध्यायाचा।७ 

स्वाध्यायाचा खुले मार्ग । जीवा न्यायानेंच वाग 
भक्तिपंथे चालू लाग । दास बोधे  ।८ 

दास बोधे सोडी स्वार्थ । हाच हाच परमार्थ 
जोडी राम होई राम । अभ्यासाने ।९ 

अभ्यासाने त्यागी होशी । अभ्यासाने ज्ञानी होशी 
अभ्यासाने योगी होशी । याच जन्मी।१०

याच जन्मी मिळे मुक्ती । कर्माची ती कळे युक्ती 
अंगी बाणे शुद्ध भक्ती । गाता गाता ।११

गाता गाता मिळे शांती । विश्रांतीचीहि विश्रांती 
अनायासे होय प्राप्ती । कैवल्याची । १२

कैवल्याची जिथे खुण । अंगी मुरवू रामायण 
न्यून ते ते करी पूर्ण । रामराजा ।१३

।। श्रीसीतारामचंद्रापर्णमस्तु ।।

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद