जीवनात आणू या राम

 २६. जीवनात आणू या राम

जीवनात आणू या राम 
श्रीराम जयराम जयजय राम ! ध्रु. 

विवेक आहे सखा सोबती 
भक्तिपथाने चरण चालती 
गाठायाचे मंगलधाम !१ 

नाम मनाला करील सज्जन
उत्साहाला हेच निमंत्रण 
कर्मे करता गाळू घाम !२ 

खरा कोण मी ओळख पटते 
करू काय मी आतुन सुचते 
अनुभूती दे आत्माराम !३ 

परिस्थिती आव्हान देउ दे 
आत्मश्रद्धा हुंकारू दे 
ते पेलाया शक्ती राम !४ 

सत्य असे हा धर्म सनातन 
तो तर जपणे प्राणहि अर्पुन 
निर्धाराचे नावच राम !५ 

पुढचे पाउल पुढेच पडते 
यज्ञासम सत्कर्मच घडते 
सद्धर्माचा प्रेरक राम !६ 

जगावयाचे राष्ट्रासाठी
मरावयाचे राष्ट्रासाठी 
दीपस्तंभच आहे राम !७

संघटना ही शक्ती आहे 
उपासना ही युक्ती आहे 
शक्तियुक्तिचा दाता राम !८

'रामायण' ना जुने पुराणे 
ते अस्सल सोन्याचे नाणे 
श्वासासंगे घेऊ नाम !९

नाम स्मरता प्रभात होते 
अज्ञानाचे तिमिर लोपते 
अरुणोदय घडवी श्रीराम !१०

चारित्र्याला जपावयाचे दक्ष 
दक्ष सदोदित असावयाचे 
चिंतामणि रामाचे नाम !११

कुलधर्मांचे घडता पालन 
राष्ट्रधर्म हा देतो दर्शन 
कर्तव्याचे नामच राम !१२

रामकथा ही सर्वस्पर्शी 
रामकथा ही हृदयस्पर्शी
जीवनात या आणू राम !१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद