श्रीरामचिंतन प्रसाद (२)

 १५. श्रीरामचिंतन प्रसाद (२) 

स्मरू या बलसागर श्रीराम !
स्मरू या गुणसागर श्रीराम!ध्रु.

'आज्ञापालन ' माय पित्याचे 
व्रत हे ठरले आयुष्याचे 
व्रतीस कोटि प्रणाम!१ 

'बंधुप्रेमा' उपमा नाही 
त्यागाला तर सीमा नाही
रघुकुलभूषण राम!२ 

'मर्यादेचे करीत पालन ' 
जितेंद्रिय हा दशरथनंदन
मुनिजनमनविश्राम!३ 

सुखदु:खी सम सदैव राही 
तोल मनाचा ढळू न देई 
'स्थितप्रज्ञ ' श्रीराम '!४

वनवासींचा मित्र 'खरोखर 
भावजीवनी रमला सत्वर 
लोकांचा अभिराम!५ 

पत्नीशी हा अनन्य राही 
हवे-नको ते आपण पाही
कोमलहृदयी राम!६

'समर्थ' हा रघुवंशी आहे 
डिंडिम अजुनी गाजत आहे 
अनुपमेय श्रीराम!७ 

वैयक्तिक सुख दूर सारले
सीतेला ही वनि पाठवले 
असा विरागी राम!८

रामराज्य तत्त्वाचे आहे 
रामराज्य त्यागाचे आहे 
प्रजाहितैषी राम!९ 

मनःसंयमन, शुद्ध आचरण
कृतीकृतीतून ईश्वरदर्शन 
सकलांचा आराम!१०

नाम जयाचे मंत्र जाहले
नामांकित पाषाणहि तरले- 
ऐसा तारक राम!११ 

राजांमधला योगी आहे 
योग्यांमधला राजा आहे 
योगिराज श्रीराम!१२ 

रामायण वाचता ऐकता 
जीवनात ये राम आणता 
किरण प्रभेचा राम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद