संस्कारांनी घडला राम

 ३० संस्कारांनी घडला राम

संस्कारांनी घडला राम 
रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम!ध्रु

राजा रक्षक संतजनांचा 
संहारक तो दुष्टजनांचा 
समूर्त पौरुष म्हणजे राम !१

गुरुगृहातच लाभे शिक्षण 
क्षात्रत्वाचे ते संगोपन 
व्यायामे बलसागर राम !२

राम धनुर्धर सदाच हसरा 
पूर्णचंद्र तो गमेच दुसरा 
शांत सुशीतल सुभाष राम!३

मायपित्यांची सेवा करतो 
भावंडांवर पाखर धरतो 
कृपाछत्र हे प्रेमळ राम !४

विश्वामित्रे यज्ञ मांडले 
रघुनाथाने रक्षण केले 
विघ्ननिवारक बलिष्ठ राम !५

पतितांना हा धरतो हृदयी 
शिळाहि स्पर्शे साध्वी होई 
पारसमणि हा मेघश्याम !६

जनक कुमारी येत जीवनी 
दोन कुलांची झाली जुळणी 
पवित्र संगम सीताराम !७

अशक्य जगती काही नसते 
यत्नावाचून सर्व राहते
भगीरथांचा वंशज राम !८

जैसी जनता तसेच 'शासन' 
हवे हवे ते जनताशिक्षण
जनतेचा ही शिक्षक राम !९

सुयोग्य शासक हवा असे जर 
प्रजा असावी कार्यी तत्पर 
लोकनाथपद भूषवि राम !१०

कुटुंबवत्सल जैसा होता 
प्रजानुरंजक त्याहुन होता 
या राष्ट्राचा नायक राम !११

त्रस्त जगाला मुक्त करतसे 
कर्तव्याचा पाठ देतसे 
रघुवंशाला होय ललाम !१२

स्वातंत्र्याचा अर्थ जाणतो 
जन्मभरी दिव्यातून जातो 
वंदनीय लोकोत्तर राम !१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद