तनामनाला औषध नामी

 २७. तनामनाला औषध नामी

तनामनाला औषध नामी रामायण गावे !ध्रु.

रघुवीराची विक्रमगाथा 
ऐकताच लवताहे माथा रोमांचित व्हावे!१

संस्कारांनी उजळे जीवन 
म्हणूनि करणे नित पारायण आत्मरूप ध्यावे!२ 

रामनाम हे असो जिभेवर 
मनास नामे बसतो आवर मने आत जावे!३ 

कर्तव्याची जी परिपूर्ती 
तीच खरी आत्म्याची शांती अनुभवास यावे!४ 

निर्भय निःस्पृह होता येते 
दुस्तरासही तरता येते प्रोत्साहन घ्यावे!५

उतरायाची कठिण कसोटी
दिव्यस्फूर्ती दे जगजेठी नामामृत प्यावे!६

स्वदेश मजला राघव वाटे
स्वधर्मपालन पूजन वाटे पूजित मी भावे!७

ध्याने कळते मर्म कथेचे
बंधन तुटते देहबुद्धिचे स्वराज्य लाभावे!८

रामनाम नित स्मरता स्मरता
रामायण जीवन ये जगता स्वप्न सत्य व्हावे!९

राम अंतरी वसला आहे
कल्याणाचे सांगत आहे तसेच वागावे!१०

रामच गावा, रामच ध्यावा
रामच ध्यावा राम पहावा रामांकित व्हावे!११

रामाठायी वसे देवपण
रामायण हे सद्गुणदर्शन सद्‌गुण जोडावे!१२

विशुद्ध व्हावे समाजजीवन
उन्नत व्हावे समाजजीवन प्रयत्न चालावे!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद