श्रीरामचिंतन प्रसाद
९. श्रीरामचिंतन प्रसाद !
स्मरू या बलसागर श्रीराम !
स्मरू या गुणसागर श्रीराम! ध्रु.
शांत सुशीतल सुमधुर भाषण, करुणावचने अमृतसिंचन
श्रांतांचा विश्राम ! १
अवघे जीवन प्रखर साधना, कण कण झिजणे गती चंदना
तप्तासी आराम ! २
पतितांचा उद्वार करावा, निरर्थकाला अर्थ मिळावा
दीनोद्वारक राम ! ३
हा भरताचा शत्रुघ्नाचा, सौमित्राचा सुग्रीवाचा
सख्यभाव अभिराम ! ४
सुता धरेची पुत्र नभाचा, संगम गमला अलौकिकांचा
जानकीजीवन राम ! ५
वनवासी जन जवळ धरावे, एकविचारे एकवटावे
कुशल संघटक राम । ६
यौवराज्य वा विजनवास वा, समान दोन्ही मनी गारवा
ऐसा शांताराम ! ७
सत्यपथाचा राघव यात्रिक, माणुसकीचा राघव मांत्रिक
पुरुषोत्तम श्रीराम ! ८
शौर्य शोभते विश्वासासह, राम धनुर्धर निज अनुजांसह
वीराग्रणी श्रीराम ! ९
देहीं असला तरी विदेही, तयास वरिते ती वैदेही
हा तर आत्माराम ! १०
ज्याच्या त्याच्या अंतरि आहे, मना सज्जना शोधुन पाहे
दासाचा श्रीराम ! ११
असुनि नसावे नसुनि असावे, कार्य करावे दूर राहावे
कमलपत्र श्रीराम ! १२
कृतीत यावा एक एक गुण, श्रीरामाचे हे तर पूजन
पूजक पूज्यहि राम ! १३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ देवधर
Comments
Post a Comment