रामायण गावे

 १९. रामायण गावे

जीवनातले भक्तितत्त्व हे आहे हनुमंत
बलोपासना गुणोपासना करते श्रीमंत !१

'जीवनमूल्यावरची श्रद्धा' जाणा श्रीराम 
श्रीरामाचा लाभ जीवनी आळविता नाम !२

परिश्रमाचे नाव लक्ष्मण आज्ञेचे पालन
आज्ञांकितता दासालागी प्रिय प्राणांहून !३

पादसेवनी रत झालेला सातत्ये भरत
कर्तव्याच्या उपासनेने रामा प्रिय होत !४

शत्रुघ्नहि तो असे विनाशक विकारशत्रूंचा
सेवेचा आनंद अलौकिक असून नसण्याचा !५

समाधान ती सीतामाई ज्याचे त्या ठावे 
रामायण हे सद्भक्ताच्या आचरणी यावे !६

देहामधले रामायण हे ऐकावे गावे
घराघराची होय अयोध्या स्वप्न सत्य व्हावे !७

विकारलंका पेटवून द्या ते कसले सोने ? 
एक असू द्या ध्येय उराशी जीवन करू सोने !८

सामजस्ये रामराज्य ये रामाची आण
सांगा का कधि वाया गेला रामाचा बाण ?९

एक एक गुण मिळता घ्यावा कौतुक देवाला 
सन्निध राहुन नित्य पाहतो अपुल्या भक्ताला !१०

नामस्मरणे सुधारते मन देवालय बनते 
राम जीवनी आहे आहे आतुन जाणवते !११

सदा सर्वदा योग तयाचा घडो हाच ध्यास 
नामाविण ना गोड लागतो अन्नाचा घास !१२

ज्ञानयज्ञ हा नामयज्ञ हा रामायण गावे
गावे भावे जनां आदरे प्रेमे सांगावे !१३

निवेदन सुजनहो, 

भक्ती करता करता श्रद्धा दृढ होते. हातून श्रम घडल्याने सातत्याने सेवा घडते आणि अंती समाधान मिळते हा साधुसंतांचा अनुभव आहे ध्यानात धरा. भक्ती म्हणजे हनुमंत, जीवनमूल्यावरची श्रद्धा हाच श्रीराम, श्रम म्हणजे लक्ष्मण, सातत्य हा भरत, अमोल अबोल सेवा हा शत्रुघ्न आणि समाधान ही सीता.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना :  जयंत कृ देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद