श्रीराम-प्रसाद

 १८. श्रीराम-प्रसाद

जा बाळांनो रामायण गा
गा बाळांनो रामायण गा!ध्रु.

घराघरातुन राम वाढवा 
अंतरिचा सद्भाव जागवा 
कर्तव्याला वरती जागा!१

शौर्य कथत जा रघुरायाचे 
सत्य कथत जा श्रीरामाचे 
चिंतन करतो तो नर जागा!२

बंधुप्रेमा उपमा नाही 
त्यागाला तर सीमा नाही 
मनापासुनी रामचरित गा!३

सत्ता जगती काय करतसे ? 
भावाला भगवंत भुलतसे 
अमृतमय श्रीरामायण गा!४

सेवा करुनी मिळवा मेवा 
देवांनाही वाटो हेवा 
नव्या युगाचा नवा वेद गा!५

धन हे येई तैसे जाई 
सत्कर्माची कीर्ती राही 
शीलधनाला जपण्याला गा!६

घराघरातुन श्रोते मिळतिल 
विघ्ने अवघी झणी पांगतील
श्रीरामाचे यशोगान गा!७

सदाशिवासम दु:ख पचावे 
चंद्रासम स्मितवदन असावे 
वनवासी श्रीराम गीत गा!८

नामरसायन औषध नामी 
प्रल्हादासम रमाच रामी 
न्यायनीतीने सदैव वागा!९

पतिनिष्ठा ती पत्नीव्रत ते 
मोल जाणती ज्ञाते श्रोते 
जीवनगीता आळवून गा!१०

उपासनेने तेज चढतसे
बलोपासना शक्ति देतसे 
बलभीमाचा पोवाडा गा!११

तुमच्यावरती केंद्रित दृष्टी
घाम गाळुनी फुलवा सृष्टी 
एकत्वाचा विणण्या धागा!१२

अर्थ जाणुनी गाता गाता, 
ध्यानी येई राम योग्यता 
आदर्शाचे ध्येयगीत गा!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद