तेथे दर्शन रामाचे

 १६. तेथे दर्शन रामाचे

जेथे जेथे दिसे दिव्यता 
जेथे जेथे दिसे भव्यता 
तेथे दर्शन रामाचे! ध्रु.

समुदायाची संघभावना 
संताच्या हृदयाची करुणा 
औदार्य ही जे मेघाचे! १

निर्भयता ती वीराची 
निरलसता जी कर्माची 
विनम्रपण जे शिष्याचे! २

आईची जी वत्सलता 
चंद्राची जी शीतलता 
सोशिकपण जे संतांचे! ३

हिमालयाची उंची ती 
वारिनिधीची खोली ती 
असीमपण आकाशाचे! ४

सत्यवचन पालन करता 
मेरूसम चित्ती स्थिरता 
अभंगपण जे वज्राचे! ५

तृषाशमन जीवन करते 
पूर्णब्रह्म पोषण करते 
जिथे सहजपण नित्याचे! ६

कर्मफलाची आस नसे 
गुरुचरणी सद्भाव असे 
हार गुंफले सुमनांचे! ७

नामामध्ये राम खरा 
आत्मबोध हा खरा
भाविक ऐसे भाग्याचे!८

टापटीप ती गृहिणीची 
उद्योजकता पुरुषाची 
पूरकपण नरनारींचे!९

कल्पकता शास्त्रज्ञांची 
प्रतिभा ती कविरायाची 
मोहकपण ते शिल्पाचे!१०

शिस्तबद्धता सैन्याची 
समयबद्धता सूर्याची 
अचूकपण जे कालाचे! ११

मने मनाला शिकवत असता 
मनें मनाला सुखवत असता 
समाधान जे चित्ताचे! १२

ध्येयध्रुवावर दृष्टि हवी 
प्रगतीची ही ओढ हवी 
पडते पाऊल नेटाचे! १३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण 
संकल्पना : जयंत कृ देवधर

Comments

Popular posts from this blog

रामसीताविवाह

रावण वध मीमांसा

श्री हनुमंताचा प्रसाद